मुंबई : भाजपाने शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक महापालिकांमध्ये गोंधळ उडाला. पुण्यात शिंदेसेनेचे उमेदवार आणि नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या अहंकारामुळे युती तुटली असे जाहीर केले. मात्र, त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी अजूनही महायुती तुटली नसल्याचे सांगितले.
पुण्यात माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, "२९ महापालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत. यात सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत, पण जगाचे लक्ष लागलेलं आहे, ते मुंबई महापालिकेकडे. मुंबई महापालिकेत महायुतीचा भगवा फडकावण्यासाठी आम्ही सगळे एकदिलाने काम करत आहोत. पुढे जात आहोत."
महायुती तुटल्याचे चित्र कुठेही नाही -उदय सामंत
"कोल्हापूर असेल, इंचलकरंजी असेल, कल्याण-डोंबिवली असेल, पनवेल असेल आणि महाराष्ट्रातील काही महापालिका असतील, या ठिकाणी देखील आम्ही महायुतीत लढत आहोत. कोणत्याही महापालिकेमध्ये महायुती तुटली, अशा पद्धतीचे चित्र नाही. हे मी पक्षाच्या वतीने स्पष्ट करत आहे", असे उदय सामंत पुण्यात बोलताना म्हणाले.
फडणवीस-शिंदेंसोबत मी चर्चा केली
"उदाहरण सांगायचं तर पुण्यामध्ये भाजपाने नक्कीच एबी फॉर्म दिले आहेत. शिवसेनेनेदेखील विचार करून एबी फॉर्म दिलेले आहेत. परंतू अर्ज मागे घेण्याची तारीख आणि अर्ज छाननीची तारीख अजून दोन-तीन दिवस आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे महायुती तुटली... पदाधिकाऱ्यांनी भावनेच्या भरात सांगितले असेल, पण मी शिवसेनेच्या वतीने सांगतोय की महायुती तुटली असे चित्र महाराष्ट्रात कुठेही नाही", असे सांगत त्यांनी महायुती जुळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
एकमत न झाल्याचे चित्र दोन दिवसात दूर करू
"काही ठिकाणी कमी कालावधीमुळे असेल किंवा एकमत न झाल्यामुळे एबी फॉर्म दिले गेले आहेत. पण, म्हणून मी उल्लेख केला की, ठाण्यात दिले गेले नाहीत. कल्याण-डोंबिवलीमध्ये दिले गेले नाहीत. कोल्हापूर, इंचलकरंजी, पनवेल नाही. छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे, ते देखील आम्ही दोन दिवसात दूर करू", अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
"२९ महापालिकांच्या एकत्र निवडणुका लागण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे नेतेमंडळींना आपापसात बोलायला वेळ कमी मिळाला. आता तीन-चार दिवस आम्हाला बोलायला वेळ आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीदेखील कुठेही गैरसमज करून घेऊ नये. पुढचा निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील", असे सांगत उदय सामंत यांनी सुरू असलेला गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.















